मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी, लता दीदींची १५ लाख रुपयांची मदत

12

गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.

इ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.

गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले.

मा. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.

आज मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वरसाम्राद्नी लता मंगेशकर यांच्याकडून प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाउंडेशनला दिनानाथ प्रतिष्ठानकडून ५ लाख तसेच लता मंगेशकर यांच्या कडून १० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!